पुणे : बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय महिला कात्रज भागातील शिवशंभोनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२३ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्यकडे बतावणी केली. या भागात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा ५५ हजारांची सोन्याची माळ लांबवून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.
२० जून रोजी मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चोैकात मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी महिलेकडील रोकड, मोबाइल संच आणि दागिने लांबविल्याची घटना घडली होती. पोलीस असल्याची बतावणी, मोफत साडी वाटप, धान्य वाटप अशी आमिषे दाखवून चोरट्यांनी महिलांची फसवणूक केली आहे.