पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी गजाआड केलं आहे. गौरी राहुल प्रतापे असे खून झालेल्या २१ वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे. तर, राहुल गोकुळ प्रतापे असं आरोपी पतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे राहत्या घरासमोर राहुलने पत्नी गौरीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. आरोपी राहुल हा सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. साडेतीन वर्षांपूर्वी गौरी आणि राहुलचा विवाह झाला होता. संसार सुखाचा चालत असताना दोघांमध्ये एका शुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यामुळं गौरी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर राहुलच्या डोक्यात तिच्याविषयी संशयाच भूत शिरलं होतं.

राहुल हळूहळू गौरीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. गौरीला समजावून पुन्हा नांदायला घेऊन आला. परंतु, संशय राहुलला शांत बसू देत नव्हता. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी गौरी आणि राहुलचे घरासमोरील रस्त्यावर भांडण झालं. आधीच राग डोक्यात असलेल्या राहुलने कोयता घेऊन पत्नीच्या डोक्यात वार केले यात तिचा मृत्यू झाला. दोघांना अपत्य नव्हते, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिलीय. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे करत आहेत.