पुणे : नवीन इलेक्ट्रिक सतत बंद पडत असल्याने एका ग्राहकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले. कंपनीतून दुचाकीची दुरुस्ती केल्यानंतरही दुचाकी बंद पडत होती. ग्राहकाने पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितल्यानंतर त्याला दिलासा मिळाला. सदोष सेवा दिल्याने दुचाकी निर्मिती कंपनी, तसेच वितरकाने ग्राहकाला दुचाकीचे ७९ हजार २२७ रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश ग्राहक आयोगाने नुकताच दिला.
पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्य सरिता पाटील आणि शुभांगी दुनाखे यांनी याबाबतचा आदेश दिला. याबाबत एकाने इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आणि औंध-बाणेर परिसरातील दुचाकी वितरकाविरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार बालेवाडी भागात राहायला आहेत. तक्रारदारांनी २१ नोव्हेंबर २०१९ रोजी ९७ हजार २७७ रुपयांना दुचाकी खरेदी केली होती. त्यात शासकीय अनुदान, विमा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्काचा समावेश होता. विक्रेत्याने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रारदाराला दुचाकी दिली. दुसऱ्याच दिवशी तक्रारदार दुचाकीवरून घरी परतत असताना ती रस्त्यातच अचानक बंद पडली. तक्रारदाराने विक्रेत्याकडे नेऊन दुचाकी दुरुस्त करून घेतली. त्यानंतर महिनाभरातच दुचाकी पुन्हा बंद पडली. तक्रारदाराला दुसरी दुचाकी वापरास देण्यात आली. मात्र, तीदेखील बंद पडली. दुचाकी बंद पडण्याबाबतचे कंपनी, तसेच वितरकाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.
त्यानंतर तक्रादाराने ग्राहक आयोगात धाव घेतली. ॲड. मिलिंद महाजन यांनी तक्रारदाराच्या वतीने बाजू मांडली. तक्रारदाराच्या दुचाकीच्या बॅटरी सर्किटमध्ये दोष असून, उत्पादक कंपनीने नवीन बॅटरी पाठविल्यावर दुचाकी दुरुस्त करण्यात आली आहे, असा दावा दुचाकी कंपनीने केला होता. आयोगाने हा दावा फेटाळून तक्रारदार ग्राहकाला ७९ हजार २२७ रुपये तक्रार दाखल झाल्यापासून सहा टक्के व्याजदरासहित परत करावेत, असा आदेश दिला. तसेच ग्राहकाला झालेला मानसिक त्रास आणि तक्रारखर्चापोटी ६० हजार रुपये देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले.