पिंपरी : समाजमाध्यमावर येणाऱ्या ‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके’ नावाची फाइल डाउनलोड केल्याने नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. गेल्या आठवडाभरात सुमारे १५ प्रकरणे समोर आली आहेत. संबंधित फाइल डाउनलोड करताच मोबाइल फोनचे नियंत्रण अज्ञात व्यक्तींच्या हातात जाते. त्यामुळे अनधिकृत ॲप डाउनलोड करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगार मोबाइलमधील उपलब्ध माहितीचा वापर करून नवीन ई-सिम कार्डची विनंती करतात आणि ते प्राप्त करून घेतात. बँक खात्याशी जोडलेले पर्यायी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीदेखील बदलतात. इंटरनेट बँकिंगचा वापर करून बँक खात्यातून पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न केला जातो, असे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सांगितले.‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके’सारखी कोणतीही फाइल डाउनलोड करू नये. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या माहितीसाठी mahatrafficechallan.gov.in या राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच संपर्क साधावा,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
व्हॉट्सॲपचे ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ सक्रिय करा, पोलिसांचे आवाहन
‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके’ सारखी कोणतीही फाईल डाउनलोड करू नये, व्हॉट्सॲपचे ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ सक्रिय करावे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या माहितीसाठी mahatrafficechallan.gov.in या राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच संपर्क साधावा. कोणतेही अनधिकृत ॲप डाउनलोड करु नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.
‘आरटीओ ट्रॅफिक चलन डॉट एपीके फाईल’ पाठवून फसवणूक होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. कोणतीही एपीके फाईल डाउनलोड करू नये. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहावे. याबाबतच्या फसवणुकीबाबत http://www.cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.