पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत आमिष दाखवून चौघांची ८२ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एप्रिल महिन्यात संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना एका समाजमाध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले. गुंतवणूक योजनांची माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना रकम गुंतविण्यास सांगितले.
सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यावर त्यांनी वेळोवेळी २३ लाख १९ हजार रुपये जमा केले. रकम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिलाा नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करत आहेत.
वारजे भागातील एकाची सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.
वडगाव शेरीतील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे अमािष दाखवून चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केली. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रकम दिल्यानंतर त्याला आणखी रकम गुंतविण्यास चोरट्यांनी सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी २७ लाख ७७ हजार रुपये गुंतविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
क्रेडीट कार्डवरुन आठ लाखांचे कर्ज
लोहगाव भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी सात लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी एका बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन तरुण वापरात असलेल्या क्रेडीट कार्डची माहिती घेतली. तरुणाने बँकेच्या तपशीलासह क्रेडीट कार्डचा सांकेतिक शब्द चोरट्यांना दिला. चोरट्यांनी या माहितीचा गैरवापर करुन तरुणाच्या क्रेडीट कार्डवरुन सात लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज काढले. याबाबत तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.