पुणे : पानशेत आणि वरसगाव धरणासह खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रविवारी विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग संध्याकाळपर्यंत टप्प्याटप्याने वाढविण्यात आला. खडकवासला धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता १८ हजार ४८३ क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला.
मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या परिसरात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, महापालिकेकडूनही पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, अशी सूचना जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची सूचनाही नागरिकांना समाजमाध्यमातून देण्यात आली आहे.शहराला पाणीपुरठा खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दीड महिन्यापासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सकाळी आठ या कालावधीत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी ९ मिलिमीटर, पानशेत धरण परिसरामध्ये प्रत्येकी १६ मिलिमीटर, तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.
पानशेत धरणातून सायंकाळी पाच वाजता ३ हजार ६०८ तर वरसगाव धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ७३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने तो नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात मध्ये सुरू असलेला ७ हजार ६३२ क्युसेक विसर्ग दुपारी एक वाजता ११ हजार ३१२ क्युसेक एवढा करण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यामध्ये वाढ करून तो १४ हजार ३७६ क्युसेक असा सुरू होता. सायंकाळी सहा वाजता १८ हजार ४८३ क्युसेक वेगनाने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
साखळी प्रकल्पात २६.५४ टीएमसी साठा
टेमघर धरण ८५.९१ टक्के, वरसगाव ९६.१४ टक्के, पानशेत ९१.९१ टक्के, तर खडकवासला ७५.६० टक्के भरले आहे. त्यामुळे या चारही धरणांमध्ये मिळून २६.५४ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये मिळून २३.४९ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.