पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे दिसताच वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून धावपट्टीवरूनच विमान माघारी वळविल्याची घटना रविवारी घडली. तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी या विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले.
विमानतळावरून दुपारी १२ वाजता दिल्लीला जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडून तांत्रिक दुरुस्तीचे कारण देऊन सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विमानाचे उड्डाण होणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना पाच तास विमानतळावरच प्रतीक्षा करावी लागली.
वेळापत्रकानुसार प्रवासी विमानात बसल्यानंतर दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाले. पाच वाजून १५ मिनिटांनी विमान धावपट्टीवर आले. इंजिन सुरू असताना वैमानिकाला पुन्हा तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवले. त्यामुळे वैमानिकाने धावपट्टीवरील विमान माघारी वळवून प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली.
अगोदरच पाच तास विलंब झाला असताना पुन्हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आल्याने विमानातील प्रवासी दिशा श्राॅफ यांनी समाजमाध्यमावरून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार ‘गेल्या पाच तासांपासून आम्ही विमानात बसून आहोत. त्यामुळे प्रवास रद्द करून माझे साहित्य, पिशव्या परत द्याव्या,’ अशी मागणी केली.
कंपनीकडून स्पष्टीकरण
तांत्रिक बिघाडामुळे दुपारी ५.१५ मिनिटांनी विमान दिल्लीकडे जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान धावपट्टीवरून पुन्हा मूळ जागेवर आणावे लागले. मात्र, प्रवाशांना दोन तास विमानात बसवले गेले, ही माहिती चुकीची आहे. एक तासाने प्रवाशांना खाली उतरवले गेले. दुपारी १२ वाजता विमानाचे उड्डाण होऊ शकणार नाही, सहा तास विलंब होणार आहे, याची कल्पना अगोदरच प्रवाशांना देण्यात आली होती. प्रवाशांना नाश्ता देण्यात आला,’ असे स्पष्टीकरण विमान कंपनीकडून देण्यात आले.