दीर्घिकांच्या समूहामध्ये अडकलेल्या, आजवर ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या अवशेषीय रेडिओ आकाशगंगेचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. सुमारे २६० दशलक्ष वर्षे वय असलेल्या आणि आणि १.२ दशलक्ष प्रकाश वर्षे पसरलेल्या या रेडिओ आकाशगंगांची जोडी एबेल ९८० या दीर्घिकांच्या समूहामध्ये स्थित असून, या संशोधनामुळे भविष्यात दीर्घिकेच्या केंद्रामध्ये असणाऱ्या भव्य वस्तुमानाच्या कृष्ण विवरातील जेट प्रक्रियांच्याउत्पत्तीचा अभ्यास करण्यास दिशा मिळू शकेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. सुरजित पॉल यांच्या नेतृत्त्वाखालील संशोधन चमूमध्ये समीर साळुंखे, डॉ. सतीश सोनकांबळे, शुभम भगत, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीतील प्रा. गोपाल कृष्ण यांचा सहभाग होता. खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), व्हेरी लार्ज ॲरे, लो-फ्रिक्वेंसी ॲरे आणि चंद्रा एक्स-रे वेधशाळा यांच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी संशोधन केले. या संशोधनाचे दोन शोध निबंध ‘ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ या संशोधनपत्रिकेत, पब्लिकेशन्स ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलियाच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले.

मोठ्या आकाशगंगांच्या केंद्रस्थानी भव्य वस्तुमानाची कृष्णविवरे असल्याचे मानले जाते. त्यांचे वस्तुमान दशलक्ष ते अब्जावधी सूर्याच्या समतुल्य असते. सक्रिय अवस्थेत ही कृष्णविवरे सापेक्ष चुंबकीय प्लाझ्माचे दोन विरुद्ध दिशांना ‘जेट्स’ बाहेर काढतात. प्रत्येक जेट पुढे ‘लोब’मध्ये विस्तारित होऊन ते रेडिओ-लहरीमध्ये विकिरण करतात. अब्जावधी प्रकाशवर्षांच्या अंतरापर्यंतचे ‘रेडिओ लोब’ मोठ्या रेडिओ दुर्बिणीद्वारे शोधले जाऊ शकतात. आकाशगंगेतील भव्य वस्तुमानाच्या कृष्णविवराच्या जेट उत्पादनाची प्रक्रिया अनेकदा काही दशलक्ष वर्षे टिकते, त्यानंतर जेट्सचे उत्पादन आणि त्यांच्याद्वारे रेडिओ लोबमधील ऊर्जा पुरवठा बंद होतो. नंतर दोन्ही रेडिओ लोब वेगाने फिकट होतात आणि दुर्बिणीद्वारे टिपण्याच्या क्षमतेपलीकडे जातात. रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांद्वारे विश्वाच्या पूर्वीच्या काळात असलेल्या परिस्थितीबद्दल मौल्यवान माहिती मिळू शकते. रेडिओ लोब शोधण्यासाठीची आणखी एक आवश्यक बाब म्हणजे, त्यांना आश्रय देणारा दीर्घिका समूह शांत स्थितीमध्ये असला पाहिजे. त्यामुळे आकाशगंगेच्या अवशेषांना त्यांचे दीर्घ अस्तित्व असूनही इतर अडथळे येत नाहीत. क्ष किरण उत्सर्जनावरून एबेल ९८० हा दीर्घिका समूह शांत अवस्थेत असल्याचे दिसून आले. रेडिओ आकाशगंगांच्या जोडीकडे भावंडे म्हणून पाहता येते. त्यांची पालक त्यांच्या मध्यभागी असणारी मूळ आकाशगंगाच आहे. आतापर्यंत अशा दुहेरी आकाशगंगांची (डबल डबल रेडिओ गॅलेक्सी) अनेक उदाहरणे सापडली आहेत, असे डॉ. सोनकांबळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रा. गोपाल कृष्णा आणि सहकाऱ्यांना दोन अवशेषांच्या ‘बेपत्ता’ मूळ आकाशगंगेचे गूढ उकलण्यात यश आले. रेडिओ लोब्सच्या दीर्घ आयुष्यादरम्यान त्यांची मूळ आकाशगंगा दीर्घिका समूहाच्या गुरुत्वाकर्षण केंद्राकडे वळली आणि तिने २ लाख ५० हजार प्रकाशवर्षे अंतर कापले. दीर्घिका समूहाच्या केंद्रापर्यंत पोहोचून त्या आकाशगंगेने दुसऱ्या प्रक्रियेच्या टप्प्यात प्रवेश केला. त्यामुळे रेडिओ लोबची एक नवीन जोडी तयार झाली. ती लहान आणि जास्त उजळ आहे. गोपाल कृष्ण आणि सहकाऱ्यांनी या नवीन स्वरूपाच्या रेडिओ आकाशगंगांना ‘डिटॅच्ड डबल-डबल रेडिओ गॅलॅक्सी’ असे नाव दिले आहे.