पुणे : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ३७ व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन करण्यात येणार असून, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे.
महोत्सवाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महोत्सवाचे मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, रमेश बागवे, अब्दुल इनामदार या वेळी उपस्थित होते. ‘गणेश कला-क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर आणि कलादालन, महाराष्ट्र साहित्य परिषद, सावरकर स्मारक भवन येथे विनामूल्य सांस्कृतिक कार्यक्रम, तर शहरातील विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, पर्यटनविकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली. यंदा अभिनेत्री हेमा मालिनी यांना पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येणाप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘महोत्सवाचे पुरस्कार जाहीर’
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार, तर ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर, क्रिकेटपटू केदार जाधव, ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ, माउली कृषी पर्यटन केंद्राचे ज्ञानदेव कामठे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.
यंदा महोत्सवात काय ?
राज कपूर यांना आदरांजली देण्यासाठी अशोक हांडे प्रस्तुत ‘आवारा हूँ’ कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, जपानी नृत्याविष्कारावर आधारलेला मनीषा साठे प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’, केरळ महोत्सव, जुळ्यांचे संमेलन, संगीत सौभद्र नाटकाचे प्रयोग, नारदीय कीर्तन महोत्सव, कविसंमेलन, इंद्रधनु, उगवते तारे, ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’, महिला नृत्य स्पर्धा, मेकअप स्पर्धा, लावणी, मराठी-हिंदी गीते, पर्यटनविषयक परिसंवाद, पुण्यातील प्रेस फोटोग्राफर्सचे छायचित्र प्रदर्शन, व्यंगचित्रांचे प्रदर्शन, वारली चित्रांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शन याबरोबरच गोल्फ टुर्नामेंट, बॉक्सिंग, द डर्ट ट्रॅक, मल्लखांब, कॅरम, बुद्धिबळ, शरीरसौष्ठव आणि स्केटिंग अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन महोत्सवात करण्यात आले असल्याचे छाजेड यांनी सांगितले. ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार मदनमोहन, ओ.पी. नय्यर व सलिल चौधरी आणि नाट्य संगीत गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार या सहा कलावंतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम महोत्सवाचे मुख्य आकर्षण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.