पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळीच बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या औंधकडून शिवाजीनगरकडे जाण्याच्या बाजूचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

ऐन गर्दीच्या वेळी, सायंकाळी हा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक ते दीड तास गणेशखिंड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याने पुलावर मध्यभागी मांडव घालण्यात आला होता. तेथे दोन्ही नेत्यांच्या भाषणांसाठी आवश्यक व्यवस्थादेखील करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी उशीर होत असल्याने भाषणासाठी केलेली व्यवस्था काढून ठेवण्यात आली.

कार्यक्रम सात वाजून एक मिनिटाने पार पडला. मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले आणि अवघ्या चार मिनिटांत, सात वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री निघूनही गेले. या चार मिनिटांच्या कार्यक्रमासाठी कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप झाला. ‘वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळेच वाहतूक कोंडीचा त्रास झाला, हा विरोधाभास लक्षात राहील,’ अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी महायुतीत सहभागी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा देत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनीही ‘एकच वादा अजितदादा’ अशी घोषणाबाजी केली.