शहरातील एका प्रसिद्ध कॅफेत बन-मस्कात काचेचे तुकडे, तसेच अन्य एका हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ सापडल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. या दोन्ही घटनांमुळे उपाहारगृहातील भटारखान्यातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाद्यपदार्थात झुरळ, केस, तसेच अन्य पदार्थ सापडणे हे प्रकार तसे काही नवे नाहीत. मात्र, या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपाहारगृहचालकांनी भटारखान्याची स्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा यात तडजोड करता कामा नये, हे पुन:पुन्हा अधोरेखित होत आहे. अन्यथा, ग्राहकांच्या रोषासह कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
पुणे शहरातील देशपातळीवर महत्त्वाचे शहर आहे. परप्रांतांतून मोठ्या संख्येने नागरिक शहरात वास्तव्यास आले आहेत, कामानिमित्त परदेशी नागरिकही शहरास भेट देतात. पुण्यातील खाद्यसंस्कृती बहुढंगी आहे. शहरात अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत. तेथील खाद्यपदार्थ खवय्यांसाठी आकर्षणाचा विषय आहे. लष्कर, डेक्कन जिमखाना भागातील उपाहारगृहे देशभरात प्रसिद्ध आहेत. बन-मस्का, चहा, खारी, वाटी केकसह ऑम्लेट असे खाद्यपदार्थ खवय्यांना भावतात.
वडापाव, समोसा, कचोरी, पाणीपुरी, भेळ अशा खाद्यपदार्थांपासून मेक्सिकन, इटालियन, चायनीज, लेबनीज असे परदेशी खाद्यपदार्थही पुण्यातील उपाहारगृहात मिळतात. विविध चवींचे खाद्यपदार्थ आता गल्लोगल्लीत असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही मिळतात. दावणगिरी डोशांपासून धपाट्यांपर्यंतच्या पदार्थांचा यात समावेश आहे. शिवाय, औंध, बाणेर, पाषाण, विमाननगर भागातील उपाहारगृहे त्यांच्या विशिष्ट मेन्यूंसाठी प्रसिद्ध आहेत.
असे असताना काही घटनांमुळे खाद्यसंस्कृतीला गालबोट लागते. खाद्यपदार्थात केस, झुरळ, खिळे सापडण्याच्या घटना त्यातीलच. मध्यंतरी विमाननगर भागातील एका प्रसिद्ध कॅफेतून मागविलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडला होता. खाद्यपदार्थ सुरक्षा, स्वच्छतेची जबाबदारी, नियंत्रण, नियमावली निश्चित करण्याचे काम अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) केले जाते. ‘एफडीए’कडून खाद्यपदार्थ विक्री, व्यवसाय परवाना दिला जातो. शहरातील बार, रेस्टॉरंट, उपाहारृहचालकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हा परवाना घेणे बंधनकारक आहे.
उपाहारग्रहचालक, बार, रेस्टॉरंटचालकांना नियमांच्या अधीन राहून काम करावे लागते. मात्र, गल्लोगल्ली हातगाडी, स्टाॅलमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नियंत्रण राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, तसेच फेरीवाला प्रमाणपत्र घेऊन गल्लोगल्ली खाद्यपदार्थ विक्री केली जाते. काही खाद्यपदार्थ गाड्या बेकायदा असतात. सायंकाळनंतर चौकाचौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर खवय्यांची झुंबड उडते. व्यवसाय, शिक्षणानिमित्त स्थिरावलेल्यांसाठी रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ (स्ट्रीट फूड) आधार असतात.
शहरातील खाद्यसंस्कृतीचा नावलौैकिक देशपातळीवर पोहोचला आहे, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना उपाहारगृहचालकांनी किमान स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. उपाहारगृह चकचकीत दिसले, तरी भटारखान्यातील स्वच्छतेचे निकष पाळावे लागणार आहेत. ग्राहक सजग झाले आहे. एखादा गैरप्रकार घडल्यास ग्राहक त्वरित समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करतात. ‘एफडीए’कडे ऑनलाइन तक्रार केली जाते.
‘एफडीए’चा अहवाल, चौकशी आणि सरतेशेवटी पोलीस दफ्तरी गुन्हा दाखल होण्यापर्यंत प्रकरण पोहोचू शकते. कष्टाने उभ्या केलेल्या उपाहारगृहाच्या नावाला एका चुकीमुळे काळिमा लागतो. त्यामुळे भटारखान्यातील स्वच्छतेपासून अनेक बाबींची तपासणी उपाहारगृहचालकांना करावी लागणार आहे. उपाहारगृहातील कामगारांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
‘एफडीए’च्या अधिकारी वर्गाने उपाहारगृहांची नियमित तपासणी करून खाद्यपदार्थांचा दर्जा तपासावा, तसेच गल्लोगल्ली असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नियमावली निश्चित करावी. तरच, खाद्यसंस्कृतीला गालबोट लागण्याच्या घटना रोखणे शक्य होईल.
rahul.khaladkar@expressindia.com