पुणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने सायंकाळी शहर आणि उपनगराला झोडपले. विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास जोरदार सरी कोसळल्या. शिवाजीनगर येथे ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. गुरुवारी रात्रीही विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला होता. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर आभाळ भरून येत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. पावसाची तीव्रताही जास्त होती. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे ५५ मिलिमीटर, लोहगाव येथे ४५ मिलिमीटर, चिंचवड येथे ४७, लवळे येथे ३८.५, मगरपट्टा येथे ४०.५, तर एनडीए येथे १०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या तासाभरात झालेल्या पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. मोठी वाहतूक कोंडी झाली. भोसरीत एका मोटारीवर झाड पडले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बीआरटी मार्गात चिंचवड, आकुर्डीत पाणी साचले होते. पवळे पुलावर, निगडी, यमुनानगर, चिखली, बिजलीनगर, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळेतील भुयारी मार्गासह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला.