पुणे : शहरातील जल्लोषमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला झाली. त्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.
आरोग्य विभागाने विसर्जन मार्ग व घाटांवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तैनात केले होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. महापालिकेकडून १५ वैद्यकीय पथके, ८० वैद्यकीय अधिकारी आणि सुमारे २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथके नेमून त्यांच्याशी समन्वयाची जबाबदारी परिमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती.
महापालिकेच्या आरोग्य पथकांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान शनिवारी व रविवारी एकूण १२० जणांवर आपत्कालीन स्थितीत उपचार केले. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, अपघात, चक्कर येणे, किरकोळ दुखापत अशा घटना प्रामुख्याने घडल्या. अशा रुग्णांवर तिथेच उपचार करण्यात आले. त्याचबरोबर प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. याचबरोबर १०८ बीव्हीजी रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून ४०१ रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यांच्याकडून २५ रुग्णवाहिका आणि ३ दुचाकी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
‘संजीवनी’ स्वयंसेवकांचीही मदत
यंदाच्या गणेशोत्सवात वैद्यकीयचे विद्यार्थी आणि ढोल-ताशा पथकातील वादक यांना सीपीआर म्हणजेच जीवनरक्षक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘संजीवनी’ उपक्रम हाती घेण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान यातील स्वयंसेवकांनी वीसहून अधिक जणांवर आपत्कालीन स्थितीत उपचार केले. असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट अँड डेव्हलपमेंट इन ॲक्सेसिबल रीसोर्सेस (आदर फाउंडेशन, पुणे) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने ‘संजीवनी’ उपक्रम राबविण्यात आला.