पुणे : ‘यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत,’ असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. ‘उत्सवासाठी गेल्या वर्षीची परवानगीही ग्राह्य धरली जाईल. वेगळ्या पोलीस परवानगीची आवश्यकता नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ रविवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे आणि शाळांपैकी १०६ मंडळे तसेच शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
अमितेश कुमार म्हणाले, ‘गेल्या वर्षी पहिल्यांदाच पुण्यात नियोजन केले. पुण्याच्या उत्सवाचे स्वरूप विशाल आहे. सामान्य नागरिक यामध्ये सहभाग घेतात. त्यामुळे यंदाचा बंदोबस्त हा सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. पोलीस प्रशासन उत्सवामध्ये कोणताही हस्तेक्षप करणार नाही. वाहतूक सुरळीत करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात येईल.’
उल्हास पवार म्हणाले, ‘संघटन आणि प्रबोधनानंतर जनआंदोलन उभे राहावे, ही गणेशोत्सवामागील लोकमान्यांची भूमिका होती. डीजे म्हणजे गणपती नाही. फार मोठा आवाज म्हणजे गणेशोत्सव नाही. आज उत्सवाचे रूप बदलले, तरीदेखील १०० वर्षांपूर्वी बँड हे गणपतीपुढे असायचे.’ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
‘दुसऱ्या दिवशी बाराच्या आत मिरवणूक संपवायला हवी’
‘यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ च्या आत विसर्जन मिरवणूक संपवायला हवी. त्यामुळे यंदा मिरवणूक सकाळी १०.३० च्या ऐवजी दोन तास आधी सुरू व्हावी. आपण धार्मिक उत्सव साजरा करतो, त्यामुळे याबाबत विचार व्हायला हवा. दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक लवकर संपविणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशीला लवकर म्हणजेच दोन तास आधी मिरवणुकीत निघावे,’ अशी सूचना अण्णा थोरात यांनी केली.