पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकून दागिने लूट प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली होती. चौकशीत सराफी पेढीच्या मालक कर्जबाजारी झाल्याने देणेकऱ्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने चुलतभावाच्या मदतीने सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चुलतभावाला अटक करण्यात आली आहे.

धायरीतील काळूबाई चौक परिसरातील ‘श्री ज्वेलर्स’सराफी पेढीवर मंगळवारी (१५ एप्रिल) भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली होती. सराफी पेढीचा मालक आणि कर्मचाऱ्याला खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळ्यांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले होते. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने चोरट्यांना प्रतिकार केला. झटापटीत चोरट्यंकडील पिस्तूल सराफी पेढीत पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिस्तूल ताब्यात घेण्यात आले. तेव्हा ते खेळण्यातील असल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन दरोडा टाकणाऱ्या दोन जणांना अटक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा सराफी पेढीच्या मालकाच्या चुलत भावाने सराफी पेढीवर दरोडा टाकण्यास सांगितले हाेते. सराफी पेढीच्या मालकावर २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज होते. त्याने काही जणांकडून पैसे घेतले होते. देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सराफी पेढीच्या मालकाने चुलतभावाच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचल्याचे तपासात उघडकीस आले. सराफी पेढीत दरोडा टाकल्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले होते. दरोड्यासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गु्न्हा करुन पसार झालेल्या चोरट्यांनी दुचाकी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर लावली होती. दुचाकी कोठून चोरली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.