पुणे : उपाहारगृहात १३ वर्षाच्या अल्पवयीनाला कामावर ठेवणाऱ्या उपाहारगृह मालकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रतन दाजिबा यादव (वय २९, रा. वारजे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे एक सामाजिक कार्यकर्ते असून ते मुंबईतील ‘कम्युनिटी कमिटेड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेत कार्यकर्ते आहेत. या संस्थेकडून बालकामगार, तसेच बाल विवाह रोखण्यासंदर्भात कार्य केले जाते. १० ऑगस्ट रोजी यादव यांच्या संस्थेला माहिती मिळाली.

कात्रज- मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी चौकाजवळ असलेल्या एका उपाहारगृहात अल्पवयीनाकडून काम करून घेतले जात असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक राजेंद्र ताठे, दीपक पोळ आणि अलका गवारी यांच्या पथकाने काळेपडळ पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.

कामगार उपायुक्त कार्यालयातील पथक, तसेच पोलीस तेथे गेले. त्या वेळी १३ वर्षीय अल्पवयीन तेथे काम करताना आढळला. चौकशीत अल्पवयीन मूळचा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली. पंधरा दिवसांपासून तो उपाहारगृहात काम करत असल्याची माहिती मिळाली. उपाहारगृह मालकाने त्याला नऊ हजार रुपये मासिक वेतन देण्याचे निश्चित केले होते.

उपाहारगृह मालकाने अल्पवयीनाकडून कमी वेतनात जास्त श्रमाचे काम करुन घेतले, तसेच त्याचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करत असल्याचे दिसून आले. आता याप्रकरणी अल्पवयीन न्याय कायदा २०१५ चे कलम ७९ आणि भारतीय न्यायसंहिता कलम १४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील उपाहारगृह, तसेच अन्य ठिकाणी अल्पवयीनांना कामावर ठेवले जात आहे. कमी वेतनात त्यांच्याकडून जास्त श्रमाची कामे करुन घेतली जात आहेत. बहुतांश बालकामगार हे परप्रांतातील आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या, दुकानात, तसेच उपाहारगृहात काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बालकामगारांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव अनेक व्यावसायिकांना नसते. असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत कामगार उपायुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, तसेच पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.