धनकवडीतील आंबेगाव पठार भागात टोळक्याने दहशत माजवून मोटारींच्या काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी टोळक्याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश रांजणे (वय ३१, रा. आंबेगाव पठार) यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दहा ते पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणे, कालिदास गायकवाड, निलेश जाधव, नंदकुमार माने यांनी स्वामीनगर परिसरात रस्त्याच्या कडेला मोटारी लावल्या होत्या. मध्यरात्री बाराच्या सुमारास दहा ते पंधरा जणांचे टोळके दुचाकीवरुन स्वामीनगर परिसरात आले.
टोळक्याने परिसरात दहशत माजवून शिवीगाळ केली. टोळक्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या चार मोटारींच्या काचांवर दगडफेक केली. शिवीगाळ करुन टोळके पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत.
