पुणे : महाराष्ट्रातील उद्योगांना जागतिक पातळीवर व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’च्या (एमसीसीआयए) वतीने ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’चे आयोजन २४ व २५ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध देशांतील वाणिज्य दूत पुण्यात येणार असून, येथील कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारी वाढविण्याबाबत चर्चा करणार आहेत.

याबाबत ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले की, ‘एमसीसीआयए’च्या वतीने ही सहावी ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’ होत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटमध्ये २४ व २५ फेब्रुवारीला ही परिषद होईल. या परिषदेत २४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता होणाऱ्या उद्घाटनाच्या सत्रात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम आणि ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’चे भारतातील अध्यक्ष डॉ. जनमेजय सिन्हा उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिडेट’चे अध्यक्ष रवी पंडित, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील कंपन्यांची परदेशातील कंपन्यांसोबत व्यावसायिक भागीदारी वाढविण्यावर या परिषदेत भर देण्यात येणार आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठांचा शोध घेतला जाणार आहे. अमेरिकेसह युरोप आणि आसियानमधील १३ देशांचे वाणिज्यदूत या परिषदेत सहभागी होणार आहेत. पुण्यासह राज्याच्या इतर भागातील निर्यातदारांसोबत भागीदारी करण्यास इच्छुक असलेल्या ५० परदेशी व्यवसाय प्रतिनिधीही परिषदेला हजेरी लावणार आहेत. ते राज्यातील निर्यातदारांशी चर्चा करतील, असे गिरबने यांनी सांगितले.

परिषदे नेमका कशावर भर?

  • जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीतील नवीन बदलांवर विचारमंथन.
  • जागतिक पुरवठा साखळी सक्षम करीत पर्यायी साखळी निर्माण करणे.
  • भारत आणि परदेशातील कंपन्यांसोबत व्यवसाय भागीदारी वाढविणे.
  • लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जागतिक व्यवसाय संधी शोधणे.