पुणे : कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल श्रीकांत जोशी (वय ४९, रा. कर्वेनगर, एसबीआय बँकेसमोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी हे सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून कर्वेनगरमधील समर्थ पथ परिसरातून घरी निघाले होते. जोशी हे खासगी नोकरी करत होते.
अलंकार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर झाडाची फांदी दुचाकीस्वार जोशी यांच्या अंगावर कोसळली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून जवानांनी रस्ता वाहतुकीस माेकळा केला. अपघातानंतर कर्वेनगर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
जीवघेण्या फांद्यांचे बळी
दोन वर्षांपूर्वी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ झाडाची फांदी पडून अभिजीत गुंड या तरुणाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी बिबवेवाडी भागात झाडाची फांदी काेसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.