पुणे: पुण्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना पिकअप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा महिला भाविकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर चाकण आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे पाईट परिसरातून काही महिला भाविक श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी पिकअपने चालल्या होत्या. भरधाव पिकअप नागमोडी वळणावर घाट चढत असताना अचानक रिव्हर्स आला. पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप थेट शंभर फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन जागीच सात महिला भाविकांचा मृत्यू झाला तर ३० पेक्षा अधिक महिला जखमी झाल्या. एकूण मृतांची संख्या आता दहा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिकेतून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघात मृत्यू झालेल्या महिलांची नावे

१) मंदाबाई कानीफ दरेकर (वय ५० वर्षे)

२) संजाबाई कैलास दरेकर (वय ५० वर्षे)

३) मिराबाई संभाजी चोरघे (वय ५० वर्षे)

४) शोभा ज्ञानेश्वर पापळ (वय ३३ वर्षे)

५) सुमन काळुराम पापळ (वय ५०)

६) शकुबाई तान्हाजी चोरघे (वय ५०)

७) शारदा रामदास चोरघे (वय ४५)

८) बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर ( वय ४५)

९) पार्वतीबाई दत्तू पापळ (वय ५६ वर्षे)

१०) फसाबाई प्रभू सावंत (वय ६१ वर्षे)