पिंपरी : पाईटजवळील (ता. खेड) शिव कुंडेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो ३० फूट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात प्रकरणी आता चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. टेम्पोचा मालवाहतूक परवाना असतानाही दाटीवाटीने प्रवासी बसविल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला आहे.

ऋषिकेश रामदास करंडे (वय २५, रा. पाईट) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत सिद्धीका रामदास चोरघे (वय २१) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशकडे टेम्पोचा मालवाहतूक परवाना आहे. असे असताना त्याने टेम्पोत दाटीवाटीने प्रवासी बसविले. तीव्र चढ, वळणाचा घाट असून अपघात होण्याची जाणीव होती. असे असतानाही महिला, लहान मुले-मुली यांना टेम्पोच्या टपावर, केबिनमध्ये, पाठीमागील हौदामध्ये दाटीवाटीने बसविले.

टेम्पो पापळवाडी ते श्री क्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिराकडे घेऊन जात होता. कुंडेश्वर मंदिराच्या डोंगर पायथ्यालगत घाटातून टेम्पो चालविताना त्याचे नियंत्रण सुटले. टेम्पो पाठीमागे आला. उजव्या बाजूस टेम्पो ३० फूट दरीत खाली कोसळला. यात दहा महिलांचा मृत्यू झाला आहे, तर २७ महिला, मुले गंभीर, किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी किरकोळ जखमी झालेल्या चालक ऋषिकेश याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे तपास करीत आहेत.

अपघातात दहा महिलांचा मृत्यू

शोभा पापळ (३३), सुमन पापळ (५०), शारदा चोरगे (४५), मंदाबाई दरेकर (५०), संजाबाई दरेकर (५०), मीराबाई चोरगे (५०), बायडाबाई दरेकर (४५), शकुबाई चोरगे (५०), पार्वतीबाई पापळ ( ५६) आणि फसाबाई सावंत (६१) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.

चार लाख रुपयांची आर्थिक मदत

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.