पुणे : प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचा कोंढव्यातील कत्तलखाना बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे महिन्यात दिले होते. त्यामुळे हा कत्तलखाना बंद करण्यात आला होता. अखेर हा कत्तलखाना सुरू करण्यास मंडळाने सशर्त परवानगी दिल्याने तो आता सुरू झाला आहे. याचबरोबर दोन लाख रुपयांची बँक हमीही मंडळाने महापालिकेकडून घेतली आहे.

पुणे शहरात महापालिकेचा कोंढव्यात एकमेव कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यात प्रामुख्याने म्हैसवर्गीय प्राण्यांची कत्तल केली जाते. या कत्तलखान्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कत्तलखान्याची तपासणी केली होती. त्या वेळी नियमांचे उल्लंघनप्रकरणी महापालिकेला नोटीस बजावून कत्तलखान्याच्या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळाने नोटीस बजाविल्यानंतरही महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे मंडळाने अखेर कत्तलखाना बंद करण्याचे निर्देश ८ मे रोजी महापालिकेला दिले. त्यामुळे अखेर महापालिकेने हा कत्तलखाना बंद केला होता.

कत्तलखान्यास पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे कत्तलखान्याच्या ठिकाणी प्रदूषण कमी करणाऱ्या उपाययोजना सुरू करून मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने मंडळाकडे केली होती. मंडळाने महापालिकेने कत्तलखान्याच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची तपासणी करून तो पुन्हा सुरू करण्यास १३ ऑगस्टला सशर्त परवानगी दिली. त्यानुसार, मर्यादित स्वरूपात कत्तलखाना सुरू झाला असून, टप्प्याटप्प्याने याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेला मंडळाकडे दोन लाख रुपयांची बँक हमी भरावी लागणार आहे. याचबरोबर तिथे निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उपाययोजना

  • नवीन फ्लो मीटर
  • सर्व टाक्यांची स्वच्छता
  • सर्व पंपांची दुरुस्ती व देखभाल
  • एअर ब्लोअरची दुरुस्ती
  • प्रकल्प परिसराची स्वच्छता

शहरात महापालिकेचा सध्या एकच कत्तलखाना आहे. त्यामुळे तो पुन्हा सुरू करण्यास परवानगी मागण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यास परवानगी दिली आहे. सध्या १० मोठ्या जनावरांची कत्तल केली जात असून, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाणार आहे. ही क्षमता डिसेंबरपर्यंत ७० मोठ्या जनावरांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. – डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका