पुणे : कोरेगाव पार्क भागात दोघांना धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी मारहाण करुन दोघांकडील मोबाइल संच आणि रोकड लुटून नेली. याबाबत एकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दौंड तालुक्यातील खोंडाचीवाडी परिसरात राहायला आहेत. ते ३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वाडिया महाविद्यालय परिसरातून निघाले होते. त्या वेळी महावितरण कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. आरडाओरडा केला, तर जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यांच्याकडील दहा हजारांचा मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार लोणकर तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत कोरेगाव पार्क भागातील चंद्रमा हाॅटेलसमोर एकाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोरेगाव पार्क भागात राहायला आहेत. ते १६ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना धमकाविले. त्यांच्या नाकावर ठोसा मारुन कोयत्याचा धाक दाखविला. तक्रारदाराला धमकावून रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार बडे तपास करत आहेत.