पुणे : ‘राज्यकर्ते लोकशाही टिकवत नाहीत, तर सजग नागरिकच लोकशाहीसाठी गरजेचे असतात. नागरिकांना सजग व्हायचे असेल, तर वाचनाचे मूल्य जोपासायला हवे. समाजभान निर्माण करण्यात वाचनाचे मोठे योगदान असते,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संदर्भ ग्रंथतज्ज्ञ प्रसाद भडसावळे, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य शिवाजी चाळक, सचिन बेंडभर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, डॉ. निशा भंडारे आदी या वेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘वाचनातून घडणारे संस्कार महत्त्वाचे असतात. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. वाचन हे मानवनिर्मित माध्यम असले, तरी ती उन्नत मानवी संस्कृतीच आहे. वाचनातून जिज्ञासा वाढीस लागते. त्यातूनच पुढे आकलन क्षमता वाढते. वाचन आपल्या प्रगतीचाच भाग आहे. अधिक मानवीय होण्यासाठी प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे आहे.’

‘अवांतर वाचन हे निरंतर, आनंददायी शिक्षण आहे. राज्यकर्ते लोकशाही टिकवत नाहीत, तर सजग नागरिक ती टिकवतात. सजग नागरिक बनण्यात वाचनाचे मोठे योगदान आहे. लेखक, प्रकाशक, चित्रकार, वाचक आणि ग्रंथालये हे वाचन संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. आजच्या बालपिढीचे भावविश्व बदलते आणि आव्हानात्मक आहे. त्या भावविश्वात बालसाहित्यिकाने डोकावले पाहिजे,’ अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली.

भडसावळे म्हणाले, ‘संस्कार ही लादण्याची नव्हे, तर अनुकरणाची गोष्ट आहे. मुलांनी काय वाचावे, काय वाचू नये हे पालकांनी ठरवता कामा नये. मात्र, त्यांना चांगल्या साहित्यकृती उपलब्ध करून देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. पालक मुलांना वास्तववादी जगात जगण्यासाठी हतबल करत आहेत. त्यांना कल्पनेतील रसाळ अनुभव घेऊ देत नाहीत. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आवश्यक आहे.’

राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य झुंजारराव, डॉ. भंडारे आणि पुरस्कारप्राप्त लेखकांच्या वतीने कल्पना मलये यांनी मनोगत व्यक्त केले. संजय ऐलवाड यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.