पुणे : घरकुलसाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला पैसे देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्रीचे सरपंच मंगेश साबळे यांनी अंगाला चिखल लावून, हातामध्ये खुर्ची घेऊन, फुलंब्री तहसील ऑफीस, पंचायत समिती आणि पोलिस चौकी बाहेर भीक मागो आंदोलन केले होते.या आंदोलनाची चर्चा राज्यभरात झाली.
ती चर्चा थांबत नाही तोवर पुण्यातील बिबवेवाडी भागातील शरद पवार गटाचे पर्वती विधानसभा मतदार संघाचे अर्बन सेल विभागाचे अध्यक्ष अमोल परदेशी यांनी पर्वती मतदार संघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर, बिबवेवाडी पोलीस स्टेशन आणि पीएमपीएमएलच्या बसमध्ये जाऊन पर्वती विधानसभा मतदार संघात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, या मागणीसाठी खांद्यावर खुर्ची, अंगाला चिखल लावून भीक मागो आंदोलन केले.
यावेळी अमोल परदेशी म्हणाले, मागील काही महिन्यापासून पुणे शहरात गुन्हेगाराची प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून बिबवेवाडी परिसरात देखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोनसाखळी चोरी, घरफोडी, टोळी युद्ध या वाढत्या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले. त्या घटना लक्षात घेऊन पर्वती विधानसभा मतदार संघात सर्वत्र सीसीटीव्ही बसवले पाहिजे.
जेणेकरून आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य होईल आणि यातून गुन्हेगारीला आळ देखील बसेल, पण या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने, मी भीक मागो आंदोलन करण्याचा मार्ग निवडला. आज मी भीक मागून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पैसे गोळा करतोय, उद्या हीच परिस्थिती या भागातील नागरिकांवर येऊ शकते, त्यामुळे स्थानिक आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ यांनी आंदोलनाची दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.