पुणे : मावळ तालुक्यातील ३८ गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी मंडल अधिकाऱ्याला दोन लाख रुपयांची, तसेच मध्यस्थाला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
याप्रकरणी मंडल अधिकारी मारूती महादेव चोरमले (वय ५३), तसेच मध्यस्थ जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३) यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलमांनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मारूती चोरमले हे शिवणे विभागाचे मंडल अधिकारी आहेत. जयेश बारमुख मध्यस्थ आहे. तक्रारदाराच्या बहिणीने आणि त्यांच्यासोबत अन्य २१ जणांनी एका बांधकाम व्यावसायिकाला १ कोटी ९० लाख रुपये दिले होते. बांधकाम व्यावसायिकासोबत मावळ कुसगाव येथील ३८ गुंठे क्षेत्र विकसन करारनामा केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये संबंधित व्यवहार झाला होता. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने त्यांची फसवणूक केली. संबंधित जमीन त्याने दुसऱ्या व्यक्तीला खरेदीखत करून विक्री केली.
जमीन खरेदी करणाऱ्या एकाने तलाठ्याकडे सातबाऱ्यावर नोंद होण्यासाठी अर्ज केला होता. तलाठ्याने त्याचा फेरफार नोंदवून देखील घेतला. तसेच तो मंजुरीसाठी मारूती चोरमले यांच्याकडे पाठविला होता. ही बाब तक्रारदारांनी समजली. त्यानंतर तक्रारदारासह २१ जणांनी त्यावर हरकत घेतली. त्यानंतर चोरमले यांनी हरकतीवर सुनावणी घेण्यास सुरूवात केली.
नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी आणि ३९ गुंठे वादग्रस्त क्षेत्र तक्रारदार यांची बहीण, तसेच २१ जणांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी चोरमले यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. पुढील कामासाठी मध्यस्थ जयेश बारमुख याच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने चोरमले यांच्यासाठी दोन लाख आणि मध्यस्थीसाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी ‘एसीबी’कडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी (१५ जुलै) सापळा लावून तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच घेताना चोरमले यांना पकडले, तसेच बारमुखने ऑनलाइन पद्धतीने १० हजार रुपये स्वीकारल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.