पुणे : मुळशी तालुक्यातील कोलाड रस्त्यावर एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातात १२ प्रवासी जखमी झाले. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर पौड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड येथून रायगड जिल्ह्यातील खेड येथे एसटी बस सकाळी नऊच्या सुमारास मुळशीतील कोलाड रस्त्याने निघाली होती. त्या वेळी ताम्हिणी घाटमार्गे श्रीवर्धनकडून बीडकडे एसटी बस निघाली होती. मुळशीतील चाचवली गावाजवळ बीडकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस बाजूला घेत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसवर ती आदळली. अपघातात बसमधील १२ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मुळशीतील आपत्कालीन पथक आणि पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी १२ प्रवाशांना तातडीने पौड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, अपघाताची नोंद पौड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.