पुणे : मुंबई महापालिकेच्या पाठोपाठ राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख असलेल्या पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेला आला आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर) या पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हजारो तरुणांनी यासाठी अर्ज भरले असून त्यांची आता परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तरुण अभियंत्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे बारा हजार कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून नव्याने अनेक गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली जात आहेत. त्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. महापालिकेने १६९ जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ अशी ठेवण्यात आली होती.

महापालिकेने यापूर्वी देखील अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया केली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीवेळा ही प्रक्रिया रखडली होती. मात्र यावेळी ही भरती प्रक्रिया कोणत्याही आचारसंहितेच्या काळात अडकणार नाही, याची काळजी घेतली आहे. यंदा आचारसंहितेपूर्वीच जाहिरात निघाल्यामुळे ही भरती वेळेत पूर्ण होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. ही भरती स्थायी पदांसाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामील होता येणार आहे.

या भरती प्रक्रियेत सुमारे ४२ हजार जणांचे अर्ज महापालिकेकडे करण्यात आले आहेत. त्यांची छाननी केली जात आहे. पुढील प्रक्रिया म्हणून इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या १ डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. राज्यातील २० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय थोरात यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत गेल्या काही वर्षांत अनेक पदे रिक्त झाली आहेत. यापूर्वी पालिकेने २०२२-२३ मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली होती. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली. यानंतर महापालिकेने विविध विभागांसाठी आवश्यक कनिष्ठ अभियंत्यांच्या सुमारे १६९ जागांसाठी जाहिरात काढली हाेती. या भरती प्रक्रियेत सुमारे ४२ हजार जणांचे अर्ज महापालिकेकडे करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेला आचारसंहितेचे विघ्न येऊ नये, यासाठी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा महापालिका आचारसंहितेपूर्वी घेण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू होते. यासाठी ‘आयबीपीएस’ संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर दोन वेळा बैठकदेखील घेऊन चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यास परीक्षा घेणे अडचणीचे होणार असल्याने महापालिका प्रशासन यासाठी विशेष आग्रही होते.

या परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली असून, येत्या १ डिसेंबरला राज्यातील विविध २० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे शहरातील केंद्रांवर जवळपास साडेआठ हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे उपायुक्त थोरात यांनी सांगितले.

उपायुक्त थोरात म्हणाले, कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांनी भरलेल्या सर्व अर्जांची काळजीपूर्वक छाननी करून पात्र उमेदवारांची नियमानुसार निवड केली जाईल. पुढील दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरलेल्या यशस्वी उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.