पुणे : शहरातील रस्ते झाडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झाडणकामाची फेरनिविदा काढली जाणार आहे. गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीत दहा टक्के वाढीव दराने फेरनिविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, जुन्या अटी-शर्ती यासाठी लागू करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काढण्यात आलेल्या झाडणकामाच्या निविदांमध्ये ‘रिंग’ झाल्याचा आरोप केला जात होता. याची शहानिशा केल्यानंतर आरोपात तथ्य आढळले होते. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करून निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याची शिफारस केली होती.
शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडण्याासठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने निविदा काढण्यात येतात. यंदा निविदा काढताना पूर्वीच्या नियम व अटी बदलण्यात आल्या हाेत्या. निविदा जाहीर होण्याच्या आधी ठेकेदाराची सर्व प्रमाणपत्र तयार असणे तसेच त्याने स्पायडर मशिन खरेदी केलेली असणे आवश्यक आहे, अशी अट अनिवार्य करण्यात आली होती. ज्यांना अटी आधीपासूनच माहीत आहेत, अशा ठेकेदारांनाच ही कामे मिळणार असल्याची स्थिती होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
दरम्यान, निविदेत रिंग झाल्याचा आरोप केला जात असल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी अटी शर्ती अंतिम करण्यासाठी तांत्रिक समिती नियुक्त केली हाेती. गुरुवारी वित्तीय समितीच्या बैठकीत झाडणकामाच्या निविदांवर सविस्तर चर्चा झाली. धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडल १ मधील क्षेत्रीय कार्यालये वगळून इतर बारा क्षेत्रीय कार्यालयातील झाडणकामासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या निविदांमध्ये पूर्वी म्हणजे जुन्या अटी आणि शर्तींचा समावेश करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या झाडणकामांसाठी १० टक्के वाढीव दराने फेरनिविदा काढण्यास मान्यता देण्यात आली. तीन क्षेत्रीय कार्यालये वगळता १२ क्षेत्रीय कार्यालयांच्या निविदा काढण्यास अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता दिली.संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन