पुणे : अस्वच्छ झालेले पुणे शहर पुन्हा स्वच्छ करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे. शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागत असल्याचे चित्र दिसल्यानंतर आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील कचरा रात्रीच्या वेळी उचलण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

शहरातील रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश देऊन केवळ महापालिका आयुक्त थांबले नाहीत. तर रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याचे काम कसे होते, हे पाहण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता अचानक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शिवाजी रस्त्यावर जाऊन पाहणी केली. तसेच रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी अशा पद्धतीने पाहणी करणार असल्याने घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकारी देखील सतर्क झाले आहेत.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर घनकचरा विभागाने त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (८ जुलै) रात्री शहरातील विविध भागांतून १३६ टन कचरा गोळा केला. यासाठी १ हजार ४७२ कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. २१३ वाहनांच्या मदतीने हा कचरा गोळा करण्यात आला होता. दररोज रात्री कचरा गोळा करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी रस्त्यांवरील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गेल्या काही दिवसांपासून सकाळी अनेक भागांत जाऊन कचरा उचलला जात आहे की नाही, याची पाहणी करत आहेत. त्यावेळी सकाळी दहा-अकरा वाजताही रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर घनकचरा विभागाची कानउघाडणी करत रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याच्या स्वच्छतेसाठी आयुक्तांनी मध्यरात्री दौरा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी रस्त्यावर आयुक्तांनी ही पाहणी केली. कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद देखील साधला. आयुक्तांनी केलेल्या या दौऱ्याची चर्चा महापालिकेत सुरू असून या पुढील काळात देखील रात्रीच्या वेळी आयुक्त रस्त्यावरून स्वच्छतेची पाहणी करणार असल्याने घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतर्क झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्दळीच्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

शहरातील अनेक भागांमध्ये सकाळ, संध्याकाळ, तसेच रात्रीच्या वेळी गर्दी असते. यामध्ये गुलटेकडी, मार्केटयार्ड, टिंबर मार्केट, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, तसेच डेक्कन जिमखाना येथील खाऊगल्लीसह इतर भागांतील खाऊगल्ली असलेल्या भागांचा समावेश होतो. भागात बाजारपेठ आणि वर्दळ असते त्या रस्त्यांवर सर्रासपणे कचरा पडलेला असतो. रात्री आणि पहाटेच्या वेळीदेखील अनेक नागरिक उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करतात. त्याला या स्वच्छते मोहिमेमुळे आळा बसणार आहे.