पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनाला पाठवता येणार आहेत. पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले असून, पुढील काही दिवसांतच ते कार्यान्वित केले जाणार आहे.
शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर महापालिकेच्या पथ विभागाने दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असून, खड्ड्यांमधील खडी बाहेर येत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते.
रस्ते खोदाईनंतर अनेक ठिकाणी डागडुजीचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या पथ विभागकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. रस्ते खोदाईनंतर महापालिकेने केलेल्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. याची थेट तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र ॲप’ तयार केले आहे.
हे मोबाईल ॲप असून, याद्वारे नागरिकांना खड्ड्यांचा फोटो घेऊन तो ॲपच्या माध्यमातून अपलोड करावा लागणार आहे. हे करताना संबंधित ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांक्ष फोटोमध्ये दिसणार असल्याने या खड्ड्यांच्या जागेची निश्चित माहिती महापालिकेला प्रशासनाला समजणार आहे. तक्रार आल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित तक्रारदाराला खड्डे बुजविल्याचा फोटो पाहता येणार आहे. या ॲपचे लवकरच आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘महापालिकेने तयार केलेल्या या ॲपवर नागरिक खड्ड्याच्या ठिकाणचे दोन ते तीन फोटो, तसेच व्हिडिओ अपलोड करू शकतात. ॲपच्या माध्यमातून आलेल्या फोटोंवर जागेची माहिती मिळणार आहे. ही माहिती संबंधित भागातील महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपोआप पाठविली जाईल. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याला संबंधित भागात जाऊन खड्डा बुजवून त्याचे फोटो त्या तक्रारीच्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. ते अपलोड केल्यानंतर संबंधित तक्रारदाराला पूर्वीची स्थिती आणि काम केल्यानंतरची स्थिती दोन्ही दिसणार आहे. त्यानंतरच ही तक्रार बंद होणार आहे.’
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी पथ विभागाने तयार केलेले ॲप उपयुक्त ठरणार आहे. सध्या हे ॲप अन्ड्रॉइड व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिक आपल्या मोबाईलच्या प्ले-स्टोअर मधून ते डाउनलोड करु शकतात. पीएमसी रोड मित्र ॲप वर तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित तक्रारीचे काय झाले, याचे डॅशबोर्ड पथ विभाग प्रमुखांना दिसणार आहे. त्यामुळे एखाद्या भागातील तक्रारी नक्की काय झाले? कोणत्या अधिकाऱ्यांनी तक्रारीचे निवारण केले? किंवा दुर्लक्ष केले याची सविस्तर माहिती विभाग प्रमुखांना समजणार आहे, असे अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने हे ॲप तयार केले आहे. यावर फोटो अपलोड करता येणार आहे. तक्रारीचे निवारण केल्यानंतर संबधित अधिकारीदेखील फोटो अपलोड करणार असल्याने तक्रारदाराला संपूर्ण माहिती मिळणार आहे. लवकरच हे ॲप कार्यान्वित होईल.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख