पुणे : ‘महापालिकेच्या कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या फाइल्स, प्लास्टिक बाटल्या, कप, तसेच प्लास्टिकने सजविलेले बुके यांचा वापर पूर्णपणे बंद करावा,’ असे स्पष्ट आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. यामध्ये चहासाठी सर्रास वापरले जाणारे कागदी कपही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कपांच्या आतील बाजूला प्लास्टिकचे आवरण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कठोर होत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, महापालिकेने त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या २०१८ मधील अधिसूचनेनुसार, अविघटनशील प्लास्टिक व थर्मोकॉलच्या उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या अधिसूचनेत वारंवार सुधारणाही करण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्यायाचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांना हे आदेश तातडीने कळवावेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ आणि विभागांकरीता लागू असणार आहेत.