पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम हा उड्डाणपूल सुरू करूनही सिग्नलमुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यावर पुणे महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने बैठक घेतली. वीर बाजी पासलकर चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांचे ‘सिक्रोनायझेशन’, दुभाजक तोडणे आणि स्वतंत्र मार्गिका करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. पोलिसांनी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याने शनिवारी दुपारनंतर या उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत झाली.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यावर वीर बाजी पासलकर चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा (सिग्नल) कालावधी वाढविणे गरजेचे होते. मात्र, महापालिका आणि वाहतूक पोलिसांंमधील नियोजनाच्या अभावामुळे पूल वाहतुकीस खुला झाल्यावर पहिल्याच दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले होते.

त्यानंतर शनिवारी झालेल्या बैठकीस महापालिकेचे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, तसेच महापालिका आणि पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘या बैठकीत चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांचे सिक्रोनायझेशन करावे, तसेच अन्य काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा आढावा घेण्यात आला. या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी काही ठिकाणी दुभाजक तोडावे लागणार आहेत. तसेच नव्याने मार्गिका आखण्याचा निर्णय घेण्यात आला,असे देशमुख यांनी सांगितले.

खडकवासला, धायरी, वडगाव, नऱ्हे यांसह अन्य भागात जाण्यासाठी नागरिकांनी या नवीन उड्डाणपुलाचा वापर सुरू केला आहे. विठ्ठलवाडीपासून वीर बाजी पासलकर चौकात जाण्यासाठी वाहनचालकांना चार ते पाच मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे.

चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास येथे वाहतूक कोंडी समस्या कायम राहील. तसेच उड्डाणपुलाचा हेतूदेखील साध्य होणार नाही.- समीर कुलकर्णी, नोकरदार, धायरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलावर झालेल्या वाहतूक कोंडीबाबत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत बैठक झाली. यामध्ये काय उपाययोजना करणे आवश्यक आहेत, याचा आढावा घेण्यात आला असून, पुढील काही दिवसांत त्यानुसार उपाययोजना केल्या जातील.-युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प, पुणे महापालिका