पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथे मातीचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिकेने हे काम करणाऱ्या मूळ ठेकेदाराला नोटीस बजाविली आहे. ‘जायका’ प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असताना ही घटना घडली होती. काम करताना कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नसल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठेकेदार दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
नांदेड सिटीजवळ मुठा नदीपात्रात पालिकेच्या नदीसुधार योजनेतील ड्रेनेज लाइनचे काम सुरू होते. त्या वेळी सोमवारी संध्याकाळी मातीचा ढिगारा कोसळून तीन कामगार त्यात गाडले गेले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दोन कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींसह मृतांच्या नातेवाईकांनी नुकसानभरपाई द्यावी, तसेच दुर्घटनेचा अहवाल आठवड्यात सादर करावा, अशा सूचना आयुक्तांनी संबधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी आयुक्त नवल किशोर राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन उपचार सुरू असलेल्या कामगारांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. काम करताना कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, जायकाचे प्रकल्प प्रमुख जगदीश खानोरे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी बैठक घेऊन मूळ ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्याचे आदेश सांडपाणी व्यवस्थापन विभागाला दिले. त्यानुसार ही नोटीस देण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, झालेल्या घटनेची माहिती ‘जायका’ला कळविण्यात आली आहे. ‘जायका’चे तज्ज्ञ येथे येऊन पाहणी करून त्यांचा अहवाल देणार आहेत. मात्र, तोपर्यंत या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. या घटनेतील संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांना विमानाने पुण्यात आणले जात आहे. तसेच, त्याचे पार्थिव गावी पाठविण्यात येणार आहे.
अन् प्रशासन झाले सतर्क
जायका प्रकल्पाचे काम केले जात असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काय केले जाते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कामे सुरू आहेत तेथे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली आहे का? याची तपासणी करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. तसेच काम घेणाऱ्या ठेकेदाराने आवश्यक त्या नियमांची पूर्तता केली आहे का? काम करताना कामगार सुरक्षित रहावे यासाठी तसेच अचानक काही दुर्घटना घडल्यास त्यांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी काय उपाययोजना आहेत याची पाहणी देखील करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.