पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला २२ कोटी ६ लाख रुपयांचा थकीत मिळकतकर भरण्यासाठी पुणे महापालिकेने नोटीस बजाविली आहे. नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला.

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ रुग्णालय गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. धर्मादाय रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकतकर थकविला असल्याची माहिती समोर आली होती. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील सोमवारी महापालिका भवन येथे घेतलेल्या बैठकीत प्रशासनावर टीका केली. सर्वसामान्य नागरिकांनी कर थकविल्यास त्यांच्या दारासमोर महापालिका बँड वाजविते. मग कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या या रुग्णालयावर महापालिकेने कोणती कारवाई केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तसेच या थकीत मिळकतकराबाबत महापालिकेने योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

महापालिकेचा कोणताही कर रुग्णालयाने थकविला नसल्याचा दावा रुग्णालयाचे वैद्याकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी केला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने मिळकतकर थकविल्याप्रकरणी रुग्णालयाला मंगळवारी नोटीस बजाविली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकांच्या नावाने ही नोटीस काढण्यात आली आहे. महापालिकेने २०१६-१७ मध्ये रुग्णालयाला केलेली करआकारणी मान्य नसल्याने फाउंडेशनने पुणे महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या सर्वसाधारण करामध्ये ५० टक्के सवलत आणि उर्वरित अन्य कर महापालिकेकडे भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला मिळकतकराची रक्कम कळविली जाते. त्यांपैकी आतापर्यंत १५ कोटी रुपयांची रक्कम त्यांनी भरलेली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडे २२ कोटी ६ लाख ७६ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. दोन दिवसांत थकबाकी न भरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल. – प्रतिभा पाटील, उपायुक्त, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका