पुणे : शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रमुख रस्त्यांवर सर्रास उभी केली जाणारी वाहने, त्यावर नसलेले नियंत्रण या पार्श्वभूमीवर वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पुणे महापालिकेकडून शहरातील प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ आणि वाहने थांबविण्यास बंदी असलेले क्षेत्र (नो हॉल्टिंग झोन) लागू करण्याचा विचार केला जात आहे.

महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सात वर्षांपूर्वी (मार्च २०१८ मध्ये) शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग’, ‘नो हॉल्टिंग’, काही भागांत ‘पे अँड पार्क’चा निर्णय घेण्य़ात आला होता. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी या धोरणाला मान्यतादेखील दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. ‘आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’, तसेच चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर्स’ झोन करण्याचा प्रयत्न सुुरू केला आहे.

यासाठी पोलीस आयुक्त, तसेच वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल,’ असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले. ‘सात वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेल्या पाच रस्त्यांमधील काही रस्ते वगळून आणि त्यामध्ये नवीन रस्त्यांच्या समावेश करून एकूण सहा रस्त्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल,’ असे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ प्रस्तावित

  • जंगली महाराज रस्ता
  • नामदार गोखले (फर्ग्युसन) रस्ता
  • लक्ष्मी रस्ता
  • बिबवेवाडी
  • बालेवाडी हायस्ट्रीट
  • विमाननगर

अशी असेल शुल्करचना

रस्त्यांचे वर्गीकरण ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे करण्यात आले आहे. ज्या रस्त्यांवर वाहनांची अधिक गर्दी होते, त्या रस्त्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे. या रस्त्यांवर नागरिकांना चारचाकी वाहनांसाठी तासाला १०, १५ व २० रुपये, तर दुचाकींसाठी तासाला २, ३ व ४ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहे.

‘तीनशे चौक मोकळे’

‘या रस्त्यांवरील, तसेच शहरातील ३०० हून अधिक चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ झोन करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांनी पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रमुख १४ चौकांमध्ये ५० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉल्टिंग’ची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे चौकांतून वळणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. य़ाचप्रमाणे शहरातील प्रमुख चौकही लवकरच मोकळे होतील व तिथे वाहतुकीची गती वाढेल,’ असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

निर्णयाची अंमलबजावणी होणार का?

दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय यापूर्वीही झाला होता. मात्र, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने लोकप्रतिनिधींनी त्याची अंमलबजावणी केली नाही. आता ‘प्रशासक राज’ असून, येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे पार्किंगशुल्क लागू करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.