गेल्या १३ वर्षांत जेमतेम ३० किलोमीटरचा मार्ग विकसित;

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शाश्वत पर्याय म्हणून बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने तेरा वर्षांत बीआरटी मार्ग उभारणी आणि अन्य कामांवर जवळपास एक हजार २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून तेरा वर्षांत तीस किलोमीटर लांबीचे मार्ग विकसित करण्यात आले असले, तरीही हे मार्गही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. तुकडय़ातुकडय़ांनीच ते सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची निव्वळ उधळपट्टी झाल्याचेच चित्र पुढे आले आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी तेरा वर्षांपूर्वी बीआरटी हा पर्याय महापालिकेने स्वीकारला. तत्कालीन काँग्रेस सरकारने शहरात ११८ किलोमीटर लांबीचे जाळे निर्माण करण्यासाठी हजारो कोटी रुपये देण्याचे निश्चित केले. तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत हा निधी महापालिकेला प्राप्त झाला.

देशात बीआरटी सुरू करणारे पुणे हे पहिले शहर ठरले. मात्र त्यानंतर बीआरटी मार्गाची वाट बिकट करण्यात आल्याचे चित्र आहे. बीआरटी मार्ग सुरू करणे, त्यांचे नूतनीकरण करणे, लेखापरीक्षण करणे, गाडय़ांची खरेदी यावरच जवळपास एक हजार २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे वास्तव आहे. शहरात तीन ठिकाणी एकूण तीस किलोमीटर लांबीचे मार्ग सुरू असल्याची कागदोपत्री नोंद आहे. प्रत्यक्षात बहुतांश मार्ग बंद असून बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही कामय राहिली आहे.

स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्ग ३ डिसेंबर २००६ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सध्या या मार्गाच्या नूतनीकरणाची कामे अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यावर शंभर कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही, ही वसुतस्थिती आहे. याच मार्गाचे काही वर्षांनंतर विस्तारीकरण करण्यात आले आणि तो हडपसपर्यंत नेण्यात आला. मात्र अपुरा आणि अरुंद रस्त्यामुळे या मार्गाला विरोध झाला. सध्या हा मार्ग उभारला आहे. मात्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तो उखडण्याचे कामही सुरू झाले आहे.

नगर रस्ता, आळंदी रस्ता या मार्गावर चार वर्षांपूर्वी बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले. यातील आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्ग कसाबसा सुरू आहे. तर नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग मेट्रोच्या कामामुळे बंद आहे. टप्प्याटप्प्यात तो सुरू आहे, असा दावा महापालिका प्रशानसाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात बीआरटी मार्गातून खासगी वाहनेच येत-जात आहेत.

वाहतूक कोंडी कायम

बीआरटी मार्ग सुरू करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटू शकलेली नाही. ती कायम असल्याचे चित्र आहे. सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गातूनच खासगी वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहेत. जे मार्ग सुरू आहेत. ते टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. त्यामुळे जेथे मार्ग सुरू आहे, तेथे खासगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे.