आंबिल ओढय़ाच्या खोलीकरणाला प्रारंभ

पुणे : नालेसफाईच्या अपूर्ण कामावरून दरवर्षी टीका सहन कराव्या लागणाऱ्या महापालिके ने यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी दीड महिना अगोदर नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामांना प्रारंभ के ला आहे. करोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत बहुतांश मनुष्यबळ हे आरोग्य सेवेशी संबंधित कामात गुंतले असतानाही पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण विभागाकडून या कामांना वेग देण्यात आला आहे. त्या अंतर्गत सध्या आंबिल ओढय़ाचे खोलीकरण करण्याबरोबरच ओढय़ातील राडारोडा काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी मुख्य विभागाकडून नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने या पूर्वीपर्यंत नालेसफाईची कामे होत होती. मात्र या कामात गैरव्यवहार होत असल्याचे आणि कामे अपूर्ण राहात असल्याचे प्रकार सातत्याने पुढे आले होते. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने नालेसफाईची कामे कागदावरच दाखवून ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याचे प्रकार पुढे आल्यानंतर आता नालेसफाईच्या कामांचे क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार काढून घेण्यात आले आणि नालेसफाईची कामे मुख्य खात्याकडूनच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

कात्रज तलावातील पाणी वक्रनलिके द्वारे उपसण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सध्या ड्रेनेज दुरुस्ती आणि नालेसफाईची कामेही सुरू करण्यात आली आहेत. या कामांचे नियोजन झाले असून सध्या आंबिल ओढय़ाचे खोलीकरण आणि त्यातील राडारोडा काढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढय़ाला महापूर आला होता. त्यातच कात्रज तलावाला सांडवा नसल्यामुळे हे पाणी भिंतीवरून वाहण्यास सुरुवात झाली आणि आंबिल ओढय़ाला पूर येऊन बारा ते तेरा किलोमीटर लांबीच्या अंतरात हाहाकार उडाला. त्यामुळे सध्या वैकु ंठ स्मशानभूमी ते कात्रज तलावापर्यंतची कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी दिली. या कामासाठी तीस पेक्षा जास्त जेसीबी, पोकलेन यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या हे काम विनाअडथळा सुरू आहे. येत्या दहा ते बारा मे पर्यंत आंबिल ओढय़ातील राडारोडा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, बाणेर, औंध, कोथरूड, सिंहगड रस्ता परिसर, कात्रज, धनकवडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील ड्रेनेजची साफसफाई, चेंबरची दुरुस्ती अशा कामांनीही वेग घेतला आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची पाहणी करण्यात आली असून नालेसफाईच्या कामांचेही नियोजन झाले आहे. त्यानुसार ही कामे टप्पटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत.

कामे मुख्य खात्याकडून

शहरात १५८.३८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून पावसाळी गटारांची लांबी १७७.९६७ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्टची संख्या ४२९ आहे. नालेसफाई, ओढे-नाल्यातील राडारोडा उचलणे, नदीपात्रातील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याची कामे आता यापुढे मुख्य खात्याकडून केली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.