पुणे : महापालिकेच्या वतीने विविध कामे करण्यासाठी काढण्यात येत असलेल्या निविदांची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी निविदा समिती स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतली आहे. या समितीमध्ये लेखा विभाग प्रमुखांसह इतर महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही समिती संपूर्ण निविदा प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून दर वर्षी काही हजार कोटी रुपयांची कामे शहरात केली जातात. ही कामे करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. निविदा काढून ही कामे दिली जातात. असे असतानाही निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जातात. ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी, यासाठी निविदा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
‘महापालिकेची कामे मिळावीत, यासाठी ठेकेदारांकडून ‘रिंग’ (निविदा प्रक्रियेपूर्वीच परस्पर कामे वाटून घेणे ) केली जाते. महापालिकेच्या पूर्वगणनपत्रक समितीने निश्चित केलेल्या खर्चापेक्षा कमी दराने निविदा भरल्या जातात, त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळदेखील प्रशासनावर येते. काही विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविली जाते,’ असे आरोप केले जातात. याला वचक बसावा, यासाठी ही समिती तयार केली जाणार असल्याचे आयुक्त राम म्हणाले.
निविदा समितीमध्ये मुख्य लेखापालांसह महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. निविदेचे ‘अ’ पाकिट उघडल्यानंतर ही समिती निविदेची तपासणी करणार आहे. पूर्वगणपत्रक तयार करताना नियमांचे पालन झाले आहे का, पूर्वगणपत्रक फुगवण्यात आले आहे का, दर आणि निविदेची किंमत यांची सविस्तर तपासणी केली जाणार आहे.
महापालिकेकडे काही कामांच्या निविदा या खूप कमी दराने, तर काही विभागांच्या निविदा या अधिक दराने येतात. त्यामुळे संबधित कामांच्या दर्जावरदेखील अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होते. यामागची कारणेसुद्धा यानिम्मित शोधली जाणार आहेत. या समितीमुळे निविदांमधील गडबडीला आणि महापालिका प्रशासनावर होणाऱ्या आरोपांना चाप बसणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
विकासकामांसाठी काढण्यास आलेल्या निविदांवर अनेकदा आक्षेप घेतला जातो. अधिक कमी दराने तर कधी अधिक जादा दराने निविदा येतात. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाते. याला आळा घालण्यासाठी निविदा समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.– नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पुणे महापालिका