पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना आज (शुक्रवारी) २२ ऑगस्टला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या (शनिवारी) जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रभाग रचनेमध्ये राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने मोठे बदल केल्याची चर्चा असून प्रभाग रचना नक्की कशी झाली आहे? याबाबत इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर काही इच्छुकांनी मनासारखी प्रभाग रचना व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून मर्जीनुसार प्रभाग रचना केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुुरू आहे. महापालिकेने पाठविलेल्या प्रभाग रचनेत नगर विकास खात्याने अनेक बदल केल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेपासून दूर ठेवले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या नगर विकास खात्याने प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे पाठविताना त्यामध्ये अनेक बदल केल्याचे समजते. यामध्ये किती तथ्य आहे, यावर प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शिक्कामोर्तब होणार आहे.

राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने न्यायालयाने ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणे होणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक घेतली जाईल. यासाठी २०११ ची जनगणना लक्षात घेतली जाणार असून, शहरात १६५ नगरसेवक राहतील.

महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. ही रचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर करण्यात आली होती. आयुक्तांनी २०१७ मध्ये प्रशासनाने केलेली प्रभाग रचना आणि नव्याने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचनेची पाहणी केली. महापालिकेत नवीन गावांचा समावेश झाल्याने नवीन तयार करण्यात आलेल्या आराखड्यात काही बदल केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर ही प्रारूप प्रभाग रचना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर यांनी ४ ऑगस्टला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांच्याकडे सादर केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेने प्रत्येक प्रभाग तयार केला की, नाही याची तपासणी नगरविकास विभागाच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसमोर झाली. यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. त्याची दुरुस्ती महापालिकेने करून दिल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली.

आयोगाकडून आवश्यक ती छाननी पूर्ण करून ही प्रभाग रचना प्रसिद्धीसाठी महापालिकेकडे दिली जाणार आहे. आज दुपारपर्यंत ही छाननी पूर्ण झाल्यास संध्याकाळी महापालिका प्रभाग रचना जाहीर करण्याची शक्यता आहे. छाननी पूर्ण झाल्यास उद्या शनिवारी प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाच्या वतीने ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. यामध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा आणि प्रभागनिहाय नकाशा पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना याबाबत माहिती दिली.