पुणे : महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी लावण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. क्षत्रिय कार्यालय स्तरावर घनकचरा व्यवस्थापन विभागात अशा पद्धतीने फसवणूक होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर घनकचरा विभागाने याबाबत तातडीने याची दखल घेत प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा करत आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले होते.

याच पद्धतीने आता महापालिकेच्या मिळकतकरामध्ये सवलत देण्याचे तसेच थकलेला मिळकत कर कमी करून देण्याचे आम्ही दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने या मध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

‘पुणे महापालिकेच्या मिळकतकरात सवलत मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे. महापालिकेने अशा पद्धतीने कोणालाही अधिकार दिले नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेकडून देण्यात आले असून, आमिषाला बळी पडू नये,’ असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या मिळकतकरात सवलत मिळवून देतो. मिळकतकर कमी करून दिला जाईल, तसेच मिळकतकराची थकबाकी कमी करण्याच्या निमित्ताने काही लोक नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. महापालिकेकडे नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन सतर्क झालेल्या मिळकतकर विभागाने थेट नागरिकांना आवाहन करत फसवणूक टाळण्याचे आवाहन केले आहे.

‘शहरात काही मध्यस्थी करणारे दलाल, परिचित, अपरिचित व्यक्तीं मिळकतकर कमी करून देतो किंवा थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून रोख स्वरुपात पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. कोणीही व्यक्ती मिळकतकर कमी करून देणेबाबत खोटे दावे करत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास त्या व्यक्तींबरोबर कोणताही आर्थिक व्यवहार आणि इतर देवाणघेवाण करू नये. या व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. नागरिकांची कोणतीही फसवणूक झाल्यास त्याला पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही,’ असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेचा मिळकराचा भरणा करताना नागरिकांनी महापालिकेेचे नागरी सुविधा केंद्र, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक, पुणे येथेच रोख, धनादेश, डीडीने किंवा ऑनलाइन मिळकतकर भरावा. तसेच, त्याची अधिकृत पावती देखील घ्यावी, असे आवाहन देखील उपायुक्त सकपाळ यांनी केले आहे.