पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्थांना गणेशोत्सवासाठी ऑनलाइन पद्धतीने परवानग्या देण्यास सुरुवात झाली. शहरातील, पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील सार्वजनिक मंडळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. मंडळ व हाऊसिंग सोसायट्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका, पोलिसांनी केले आहे.

मंडळातील सभासदाने स्वतःचे खाते महापालिकेच्या संकेतस्थळावर http://www.pcmcindia.gov.in उपलब्ध असलेल्या गणेश उत्सव मंडप परवानगी २०२५ या लिंकवर तयार करणे आवश्यक आहे. खाते तयार करताना मोबाइल ओटीपीद्वारे खात्यावरील मोबाइल नंबरची नोंद घेतली जाईल. मंडळ महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आहे अथवा नाही हे नोंदवणे आवश्यक आहे. जेणेकरून आवश्यक कागदपत्रांची मागणी संगणक प्रणालीमार्फत केली जाऊ शकते. महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नोंदणी केली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभाग सर्वप्रथम ना- हरकत दाखला देईल. त्यानंतरच संगणक प्रणाली अंतिम दाखला मंडळांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे.

महापालिकेकडून ना-हरकत दाखला मिळाल्यानंतरच पोलीस आयुक्त कार्यालयाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या अर्जांना महापालिका अंतिम ना-हरकत दाखला देते, तीच प्रकरणे पोलिसांकडे संगणक प्रणालीद्वारे पाठविली जाणार आहेत. पालिकेच्या ना-हरकत दाखल्यानंतर पोलिसांकडून संबंधित अर्ज ऑनलाइन पद्धतीने त्या त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या ना-हरकत दाखल्यानंतर पोलीस कार्यालयाकडील अंतिम परवानगी मंडळास उपलब्ध होईल.

अर्ज करताना मंडळाने अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे छायाचित्र, मोबाइल क्रमांक तसेच देखाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती संगणक प्रणालीमध्ये पुरविणे आवश्यक आहे. गणेश स्थापना तसेच गणेश विसर्जन मिरवणूक यांच्या मार्गाची नोंद करणे तसेच त्यामध्ये वापरली जाणाऱ्या वाहनांची संख्या, देखावा, विद्युत रोषणाई इत्यादींची माहिती देखील नोंदविणे क्रमप्राप्त आहे. महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागामार्फत देण्यात येणारी ही सुविधा सर्व सार्वजनिक गणेश मंडळास विनाशुल्क पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

महापालिका हद्दीबाहेरील मंडळांना परवाना मिळणार

महापालिकेच्या हद्दीबाहेरील गणेश मंडळांना अर्ज करताना प्रथमतः तेथील नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडील ना-हरकत दाखला मिळवणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील मंडळांना परवाना दिला जाणार आहे. देहू, आळंदी, देहूरोड कटक मंडळ, शिरगाव, परंदवाडी, तळेगाव आदी पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणारा परिसर व त्या परिसरातील मंडळ या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

मूर्ती विक्रेत्यांची नोंदणी आवश्यक

गणेशमूर्ती विक्रेत्यांना महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून ना-हरकत दाखला दिला जातो. विक्रेते शहरातील विविध भागांतील खासगी तसेच, सार्वजनिक जागेत स्टॉल उभारतात. आवश्यक कागदपत्रे व ना हरकत दाखल्याचे शुल्क हे अर्ज करताना ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. ही नोंदणी सर्व विक्रेत्यांना आवश्यक आहे.

पोलीस आयुक्त आणि महापालिकेने एकत्रित ही संगणक प्रणाली बनविली आहे. मंडळांना कमीत कमी वेळेमध्ये दोन्ही कार्यालयाकडील ना-हरकत दाखले लवकरात लवकर उपलब्ध होतील. मंडळांना कोठेही सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारावा लागणार नाहीत, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.