पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेने मोशी कचरा डेपोत कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) दुसरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दररोज एक हजार टन सुका कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. त्यातून दररोज २७ मेगावॅट वीज निर्मिती शक्य असून भविष्यात कचरा समस्या निर्माण होणार नाही, असा दावा पर्यावरण विभागाने केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा संकलित करून मोशीतील डेपोत टाकला जातो. गेल्या ३५ वर्षांपासूनचा कचरा येथे साचला आहे. ८१ एकर क्षेत्रातील डेपोत कचऱ्याचे डोंगर तयार झाले. कचऱ्याचे डोंगर बायोमायनिंगद्वारे हटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. शहरात दररोज एक हजार ३०० टन कचरा जमा होत आहे. ते प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले.

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखी एक कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प (डीबीओटी) तत्त्वावर उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी एक हजार ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाच एकर जागेतील प्रकल्पात दररोज एक हजार टन कचरा जाळून २७ मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ५०० टन क्षमतेचे मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एआरएफ) केंद्र उभारले जाणार आहे. त्या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. तेथील वीज महापालिकेस अल्प दरात उपलब्ध होणार आहे. प्रकल्पासाठी महापालिकेचा २०० कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.

सद्य:स्थितीतील प्रकल्पातून १४ मेगावॅट वीजनिर्मिती

सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पात दररोज ७०० टन कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. प्रकल्पावर ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा प्रकल्प २१ वर्षे कालावधीसाठी आहे. हॉटेल वेस्टपासून सीएनजी तयार केला जात आहे. तसेच, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन व कच्चा माल आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे.

शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी मोशी डेपोत ‘डीबीओटी’ तत्त्वावर कचऱ्यापासून वीज निर्मितीचा दुसरा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातून दररोज २७ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. प्रकल्पाचा आराखडा तयार असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.