पुणे : दुबईला औषध निर्यात करण्याची बतावणी करून चार कोटी ४० लाखांची औषधे घेऊन एका औषध वितरकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही वितरकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत नीलेश सोहनलाल सोनिगरा (वय ४६, रा. मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश सोनिगरा यांचा न्यू अमर फार्मास्युसिटकल्स नावाने औषधे विक्रीचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील औषध विक्रेते, रुग्णालयांना औषध पुरवठा करतात. २०२० मध्ये सोनिगरा यांची महिलेशी ओळख झाली. तिचे औषध विक्री दुकान आहे. सोनिगरा तिला उधारीवर औषधे देत होते. महिलेने सोनिगरा यांची नोव्हेबर २०२४ मध्ये अन्य एकाशी ओळख करून दिली. त्याचे गुरुवार पेठेत औषध विक्रीचे दुकान आहे. त्या व्यक्तीने, दुबई येथील एका कंपनीच्या संचालकाबरोबर ओळख असल्याची बतावणी करून, त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधांच्या साठ्यांची आवश्यकता आहे, असे सांगितले. ‘ही व्यक्ती घाऊक विक्रेता आहे. त्यामुळे व्यवहारात फसविणार नाही,’ असे महिलेने सोनिगरा यांना सांगितले.

तिच्यावर विश्वास ठेवून १३ मार्च ते ८ मे या कालावधीत ४ कोटी ४० लाख ३५ हजार ९०५ रुपयांची औषधे एक महिन्याच्या उधारीवर महिलेच्या दुकानाच्या नावाने त्यांनी दिली. त्यासाठी महिलेने ६० धनादेश दिले होते. त्यानंतर ती पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. बँकेत धनादेश जमा करतो, असे सोनिगरा यांनी तिला सांगितले. तेव्हा खात्यात पैसे नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने सोनिगरा यांच्याशी संपर्क तोडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनिगरा यांनी चौकशी केली, तेव्हा तिने आणखी एका औषध विक्रेत्याकडून उधारीवर ८३ लाख ३८ हजार रुपयांची औषधे घेऊन फसवणूक केल्याची माहिती मिळाली. महिलेने त्या अन्य व्यक्तीशी संगनमत करून सोनगिरा यांच्याकडून घेतलेली औषधे त्या व्यक्तीच्या औषध विक्री दुकानात दिल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.