पुणे : शुद्ध सोने असल्याची बतावणी करून वारजे भागातील दोघा भावांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी बनावट पावत्यांचा वापर करून २२ कॅरेटचे सोने असल्याची बतावणी करून चार कॅरेटचे सोने तारण ठेवून दहापेक्षा जास्त सराफ व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
याबाबत हडपसर भागातील सराफ व्यावसायिकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी १३.३६ ग्रॅमची सोनसाखळी सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले. सोने तारण ठेवण्यासाठी असलेल्या पावतीवर २२ कॅरेट सोने असल्याचे नमूद केले होते. सोनसाखळीवर हॉलमार्कही होता. प्रत्यक्षात सोनसाखळी चार कॅरेट सोन्याची होती.
सोनसाखळीला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. शुद्धतेची तपासणी केली असता सोनसाखळीत केवळ २० टक्के सोने असल्याचे उघडकीस आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सराफ व्यावसायिकांच्या समाजमाध्यमातील समूहावर ही माहिती दिली होती. ही माहिती समूहावर प्रसारित केल्यानंतर अशा पद्धतीने नऊ सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या प्रकार उघडकीस आला. असे फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले.
फसवणूक करणारे आरोपी सोने गहाण ठेवण्यासाठी बनावट पावत्या सादर करतात. आरोपी वारजे भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांचे नाव आणि पत्त्याबाबत पोलीस साशंक आहेत. आरोपींनी कमी शुद्धतेचे सोने तारण ठेवून पुणे आणि पिंपरीतील दहा सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. आरोपींनी बनावट हाॅलमार्कचा वापर केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
सराफांना आवाहन
आरोपी गरजू असल्याची बतावणी करतात. बनावट पावत्या सादर करून कमी शुद्धतेचे दागिने सराफ व्यावसायिकांकडे तारण ठेवले. २२ कॅरेटचे सोने असल्याची भासवून आरोपींनी चार कॅरेटचे दागिने तारण ठेवून शहरातील सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. अशा प्रकारची बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहावे. सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करावी. त्यानंतर दागिने तारण ठेवून कर्ज द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चोरट्यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे.