पुणे : लोणी काळभोर भागातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून अटक केली. पोलिसांनी चोरट्याकडून दुचाकी जप्त केली.तसेच त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून रिव्हाॅल्वरसह दहा काडतुसे, ३० किल्ल्या जप्त करण्यात आल्या.
अरूण बाबुराव देशमुख (वय ६७, रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. लोणी काळभोर भागातून १७ ऑक्टोबर रोजी एक दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू करण्यात आला. तपासात चोरटा लोणी काळभोर परिसरातून बिबवेवाडीकडे गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने देशमुख याला सुखसागरनगर भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली.
तपासात त्याच्याकडे पिस्तुल, काडतुसे असल्याची माहिती मिळाली. रिव्हाॅल्वर आणि काडतुसे त्याने घरात एका पिशवीत लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून पिशवी जप्त केली. पिशवीतून एक रिव्हाॅल्वर, दहा काडतुसे, ३० चाव्या जप्त करण्यात आल्या.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, सातपुते, शिरगरे, कुदळे, पाटील, माने यांनी ही कामगिरी केली.
