पुणे : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक पदाधिकारी आपला छळ करत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे आहे. आयोगाने याची दखल घेऊन, आयोगातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेत येऊन माहिती घेतली आहे.

याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती.

या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, पुढे नक्की काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली. तक्रारीनंतरदेखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तसेच महापालिकेतील इतरांकडून माहितीदेखील घेतली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांची तक्रार समितीकडे आली होती. त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवून समितीने आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत. – डॉ. कल्पना बळीवंत, अध्यक्ष, अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती, पुणे महापालिका