पुणे स्टेशन आणि कोथरुड आगारात रात्री कामाच्या वेळेत डुलक्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना डुलकी चांगलीच महागात पडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ९ ‘डुलकी’बाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी रात्रपाळीवर असणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांनी रात्री डुलकी घेतली. ही बाब तुकाराम मुंढे यांना समजताच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले.

काल रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले ९ कर्मचारी भरारी पथकाला झोपलेले आढळून आले. कर्तव्यावर असताना काढलेली ही डुलकी या कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडली असून कामाच्या वेळेत झोपा काढणाऱ्यांना कर्मचा-यांना निलंबित केल्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले.

नक्की वाचा- तुकाराम मुंढेचा पहिलाच ‘धडा’!; ‘पीएमपीएमएल’च्या ११७ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा पगार कापला!

शहरात एकूण १३ डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्याकरता चार कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. काल या भरारी पथकाला कोथरुड आणि पुणे स्टेशन आगारातील ९ कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्यामध्ये २ बसचे चालक असून ९ कर्मचारी हे गाडयांची दुरूस्ती करणाऱ्या वर्कशॉपमधील आहेत. या ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांना धडा शिकवला होता. कार्यालयात उशिरा आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत मुंढे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला होता. नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची पुणे महापालिकेच्या परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुंढे यांनी २९ मार्चला पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकाराताच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची पूर्वीची साडेदहा ते साडेपाच या वेळेत बदल करून पावणेदहा ते पावणेसहा अशी वेळ केली. तर कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये, अशी ताकीद दिली होती.