पुणे : आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्त्यावरील धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर (जाहिरात फलक) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कारवाई करण्यात आली. पालखी मार्गासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेली सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येणार असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन येत्या २० जून रोजी होणार आहे. पुणे- सासवड रस्तामार्गे संत ज्ञानेश्वर माउलींची, तसेच पुणे-सोलापूर रस्ता मार्गे संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही रस्त्यांवरील २१ अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले असून, यापुढेही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली. या दोन्ही पालखी मार्गांवरील सर्व अनधिकृत होर्डिंग पुढील १० दिवसांत काढण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंगपासून संबंधित भागातील नागरिकांसह प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकारच्या होर्डिंगवर पीएमआरडीएच्या माध्यमातून दररोज कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जाहिरातदार आणि जागामालकांनी वर्दळीसह रहदारीच्या ठिकाणावरील धोकादायक, मर्यादेपेक्षा अधिक उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून यापूर्वी करण्यात आले होते. होर्डिंगधारकांनी अनधिकृत होर्डिंगला परवानगी घ्यावी, अन्यथा ते काढण्यात येतील. पीएमआरडीएच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन होर्डिंग उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन सह आयुक्त संजय गायकवाड यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमआरडीएचे तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शाखा अभियंता हरीश माने, तेजस मदने, शरद खोमणे, दीपक माने यांच्या पथकाने स्थानिक पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली.