पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) सल्लागार कंपनीच्या संस्थापकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर सुमारे ३०० नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडवल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी फ्लायनॉट सॅस या आयटी सल्लागार कंपनीचा संस्थापक उपेश पाटील आणि कंपनीची संचालक असलेली त्याची पत्नी पूनम पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उपेश पाटील याला हिंजवडी पोलिसांनी रविवारी अटक केली. या दोघांनी एकूण १७ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी अशा प्रकारे फसवणूक केलेल्या इतर उमेदवारांनी पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केले आहे.
नेमके प्रकरण काय?
हिंजवडीतील फ्लायनॉट सॅस या आयटी सल्लागार कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये शुल्क आकारले. प्रशिक्षणानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रोजेक्ट अलोकेशनसह ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगार निश्चित असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण व दोन महिन्यांचे मानधन तर मिळाले, मात्र त्यानंतर चार महिने पगार मिळालाच नाही. या वेळी अनेक जण कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करीत होते, तरीही वेतन देण्यात आले नाही. शिवाय, कंपनीचे कार्यालयही बहुतेक वेळा बंद होते. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडे चौकशी केली असता, कंपनीकडून उलट पोलिसांना बोलावण्यात आले होते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
फोरमची महत्त्वाची भूमिका
या प्रकरणी फसवणूक झालेल्या उमेदवारांनी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज (एफआयटीई) या संघटनेकडे धाव घेतली होती. संघटनेने याप्रकरणी या उमेदवारांसह हिंजवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार होती. तसेच, कामगार आयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली होती. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात नोकरीसाठी धडपडणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीकडे सरकार आणि कामगार यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका फोरमने मांडली आहे.
फोरमची नवीन उमेदवारांना सूचना
- पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका.
- मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिव्ह्यू आणि आर्थिक स्थिती तपासा.
- पगार न देता कंपनी बंद करणे हा कामगार वाद नसून थेट फसवणुकीचा गुन्हा आहे.